लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पवित्र रमजान महिन्याचे ३० दिवसांचे रोजे पूर्ण केल्यानंतर रविवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर मुस्लीम बांधवांनी सोमवारी ईद-उल-फितर अर्थात रमजान ईद मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. ईदनिमित्त शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. रविवारी रात्री उशिरा देशभरात चंद्रदर्शन झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील मुस्लिमांनी ईदची तयारी सुरू केली. नमाज अदा करणाऱ्यांच्या सुविधेसाठी शहरातील मुस्लीमबहुल भागांमधील मशिदींव्यतिरिक्त जुने शहरातील ऐतिहासिक ईदगाह व अकोट फाईल व खदान परिसरातील ईदगाहवर विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर सुगंधी अत्तर लावून तयार झालेले सर्वच वयोगटातील मुस्लीम बांधव सकाळीच अल्लाहची करूणा भाकण्यासाठी ईदगाहवर पोहोचले. हरिहर पेठस्थित ऐतिहासिक ईदगाहवर सकाळी १० वाजता मौलाना मोहम्मद मुस्तफा यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. अलहाज सय्यद काजी काजिमुद्दीन यांनी ईदचा अरबी खुतबा पठन केल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अकोट फाईल व खदान परिसरातील ईदगाहवरही विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. ईदनिमित्त पोलिसांनी सर्वच इदगाहवर कडक बंदोबस्त ठेवला होता. शहर आणि जिल्ह्यात अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व हर्षोल्हासात ईद सण साजरा करण्यात आला.प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छाईदनिमित्त जिल्हा प्रशासन व पोलीस दलाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी हरिहर पेठस्थित पोलीस चौकीजवळ मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने-पाटील, मनपा उपायुक्त समाधान सोळंके उपस्थित होते.
रमजान ईद हर्षोल्हासात साजरी!
By admin | Published: June 27, 2017 10:06 AM