अकोला: बंजारा बांधवांचा मोठा उत्सव असलेल्या तीज महोत्सवानिमित्त बंजारानगर येथून गणेश घाटापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा शनिवारी सायंकाळी गणेश घाटावर समारोप करण्यात आला. शहरातील बंजारानगर येथे १ ऑगस्टपासून तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजेच शोभायात्रा शनिवारी काढण्यात आली. तीज महोत्सवामध्ये दररोज विविध कार्यक्रम पार पडले असून, यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला टंबोळीचा कार्यक्रम ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता बंजारानगर येथे घेण्यात आला. त्यानंतर तीज विसर्जनाचा समारोपीय कार्यक्रम शनिवारी सकाळी १0 वाजतापासून सुरू झाला. या समारोपीय कार्यक्रमाची शोभायात्रा ९ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता बंजारानगर येथून काढण्यात आली. पुढे ही शोभायात्रा सिंधी कॅम्प, मध्यवर्ती बसस्थानक, गांधी रोड, गणेश घाटपर्यंत काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये बंजारा बांधव व महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये विविध नृत्य सादर केले. या शोभायात्रेत आणखीही देखावे सादर करण्यात आले. गणेश घाट येथे आगमन झाल्यानंतर तीज महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या महोत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी बंजारा बांधवानी सहकुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
तीज महोत्सवानिमित्त बंजारा बांधवांची शोभायात्रा
By admin | Published: August 10, 2014 6:57 PM