पातूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण केल्याचा तत्काळ परिणाम दिसून आला असून पातूर तालुक्यातील नांदखेड येथे खोलीकरण केलेल्या बंधार्यात पहिल्याच पावसात पाणी भरले. बंधारे पाण्याने तुडुंब भरले. कोरड्या पडलेल्या विहिरींना १५ ते २0 फुटापर्यंत पाणी आले. त्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे.पातूर तालुक्यात नांदखेड येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १0 सिमेंट नाल्याच्या बांधाच्या खोलीकरणास मे महिन्यात सुरुवात करण्यात आली. अल्पावधीतच खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, ३0 जून रोजी परिसरात रात्री जोरदार पाऊस आला. या पावसाने खोलीकरण केलेले बंधारे तुडुंब भरले. या परिसरात करण्यात आलेल्या २५00 मीटर खोलीकरणामुळे ९ कोटी १0 लाख लीटर पाणी प्रत्येक बंधार्यात साचेल, असा जलतज्ज्ञांचा अंदाज आहे. ३0 जून रोजी रात्रीच्या पावसाने बंधारे भरल्यानंतर ३ जुलै रोजी तीन दिवसातच सायंकाळपर्यंत परिसरातील विहिरींना १५ ते २0 फूट आले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी हा एकमेव पाण्याचा स्रोत आहे. मागील वर्षीच्या अल्प पावसामुळे विहिरी दिवाळीपासूनच कोरड्या पडू लागल्या होत्या. नाला खोलीकरणामुळे जोरदार आलेल्या पावसाने बंधारे तुडुंब भरले व त्यामुळे विहिरींना पाणी आल्याने पाणीटंचाई दूर झाली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नाला बांध खोलीकरणामुळे पहिल्याच जोरदार पावसात बंधारे भरल्याने व विहिरींना पाणी आल्याने नांदखेडवासीयांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नांदखेड परिसरात नाल्यावर आणखी चार ठिकाणी काँक्रिट बांध बांधणे आवश्यक आहे. तसेच जुन्या चार सिमेंट बांधांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. वन विभागाच्या जमिनीवर माती बांध, वनतळ्यांची निर्मिती, चर खोदणे ही कामेसुद्धा करणे आवश्यक आहे, असे नांदखेड येथील तरुण शेतकरी व भाजप पदाधिकारी ज्ञानेश्वर इंगळे यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरले सिमेंट बंधारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2016 2:20 AM