- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रॉयल्टी आणि वाहतुकीच्या अतिरिक्त खर्चावर बोट ठेवून आंध्र प्रदेशातील सिमेंट कंपन्यांनी अडवणुकीचे धोरण अवलंबल्याने महाराष्ट्रातील सिमेंटच्या दरात भाववाढ होत आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या क्रेडाईच्या राज्यस्तरीय अधिवेशनापूर्वी सिमेंट कंपन्यांतर्फे प्रत्येक गोणीमागे ३० ते ३१ रुपये भाववाढ करण्याची अधिकृत घोषणा केली जाण्याचे संकेत आहेत.राज्यात चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातून सिमेंटचा पुरवठा होत असतो. गत आठ दिवसांपासून राज्यात सिमेंटचा तुटवडा भासत आहे. सर्वात स्वस्त सिमेंट आंध्र प्रदेशातील असल्याने राज्यात सर्वात जास्त प्रमाणात त्याचा वापर होतो. शासकीय इमारतींच्या बांधकामातही आंध्राचेच सिमेंट वापरले जाते. राज्यातील असलेली मोठी मागणी लक्षात घेत आंध्र प्रदेशातील डेकन, सागर, महागोल्ड, महाशक्ती आदी कंपन्यांनी राज्यातील पुरवठा गत दहा दिवसांपासून थांबविला. त्यामुळे पर्यायाने लोकांना महागडे सिमेंट घ्यावे लागत आहे. अचानक झालेल्या सिमेंटच्या भाववाढीमुळे बांधकाम व्यावसायिक हादरले आहेत; मात्र ही भाववाढ कशामुळे होत आहे, याबाबत मात्र ठोस कारण अद्यापही पुढे आले नाही.रॉयल्टी आणि वाहतुकीवर अतिरिक्त खर्च होत असल्याची सबब तेवढी सिमेंट कंपन्यांच्या प्रमुखांनी पुढे केली आहे. जर सिमेंट कंपन्यांनी प्रतिगोणीमागे ३० रुपयांची भाववाढ केली, तर आंध्र प्रदेशातील अलीकडचे स्वस्त सिमेंटदेखील तीनशे रुपयांच्या घरात जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांवर आधीच मंदीचे सावट आहे. त्यात लोखंड आणि सिमेंटचे भाव वाढल्याने बांधकाम व्यावसायिक आणि या उद्योगाशी संबंधित साखळी उद्योगावर अवकळा आली आहे.बाजारपेठेत मागणी नसताना आणि कोणतेही ठोस कारण नसताना सिमेंटच्या किमतीत भाववाढ होत आहे. कोणतीही अतिरिक्त मागणी नसताना राज्यात सिमेंटचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा हा डाव आहे. मंदीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांवर आधीच संक्रांत आलेली आहे. त्यात सिमेंटमध्ये भाववाढ करून बेरोजगारी तयार केली जात आहे.-दिनेश ढगे,क्रेडाई, जिल्हाध्यक्ष, अकोला.
आंध्रातील कंपन्यांच्या अडवणूक धोरणामुळे वाढताहेत सिमेंटचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:24 PM