अकोला: दरवर्षी देशभरात जनगणना करण्यात येते. यंदा ही जनगणना १ मेपासून होणार होती. या जनगणनेमध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमध्ये शिक्षकांना सहभागी करण्यात आले होते; परंतु दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना होणारा त्रास, फिरताना येणाºया अडचणी लक्षात घेता, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी या सर्वांना जनगणनेच्या कामातून वगळण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले आहेत.१ मेपासून जनगणनेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती; परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनगणना सुरू करण्याची मोहीम तूर्तास थांबलेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतरच जनगणनेच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. जनगणनेच्या कामामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांचासुद्धा समावेश करण्यात आला होता. जनगणनेच्या काम करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम करावे लागणार असल्याने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना त्रास सहन करून अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांना जनगणनेच्या कामातून वगळावे, अशी मागणी राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या निवेदनानुसार आणि राज्याचे उपसचिवांच्या पत्रानुसार निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जनगणनेच्या कामातून दिव्यांग शिक्षक, अधिकारी, कर्मचाºयांना वगळण्याचे निर्देश संबंधित निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. (प्रतिनिधी)