अकोला, दि. १४- विदर्भातील सहा कापूस उत्पादक जिल्हय़ांसाठी राज्य सरकार व्यापक धोरण आखत असल्याच्या पृष्ठभूमीवर 'कॉटन सिटी' अशी ओळख असलेल्या अकोल्यात 'पतंजली' समूहाच्या प्रस्तावित 'स्वदेशी जिन्स' प्रकल्पाचे एक युनिट उभारण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर भविष्यात अकोला हे महत्वाचे केंद्र होऊ शकते त्यामुळे यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.विदर्भात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यातही अकोला जिल्हय़ात कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. हावडा-मुंबई व खंडवा-हिंगोली-पूर्णा या दोन रेल्वे मार्गावर वसलेल्या अकोला शहरात कापसावर आधारित कापड उद्योग उभारण्यासाठी बराच वाव आहे. अकोल्यात मोहता मिल व सावतराम रामप्रसाद मिल या दोन कापड गिरण्या होत्या. यापैकी मोहता मिल ही आर्थिक कारणांमुळे १९६0 मध्ये बंद पडली. त्यानंतर राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने ही गिरणी सप्टेंबर १९६१ मध्ये ताब्यात घेतली. तसेच १९१२ मध्ये स्थापन झालेली सावतराव रामप्रसाद मिल ही कापड गिरणी आर्थिक चणचण व कामगारांच्या समस्येमुळे १९६४ ते १९६८ या कालावधीत बंद पडली. कामगारांना रोजगार पुरविण्याच्या उद्देशाने शासनाने ही गिरणीही ताब्यात घेतली. तेव्हापासून या दोन्ही कापड गिरण्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहेत.व्यापारी व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले अकोला शहर रेल्वेने देशातील चारही बाजूने जोडलेले आहे. येथून जवळच असलेल्या पारस येथे औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पही आहे. शिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालयही अकोला शहरात आहे. एवढे असतानाही जिल्हय़ातील वस्त्रोद्योगाला अवकळा प्राप्त झाली आहे. 'पतंजली' वर्ष २0१६ अखेर किंवा २0१७ मध्ये विदर्भात 'स्वदेशी जिन्स' प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा योगगुरू रामदेवबाबा यांनी अलीकडेच नागपूर येथील 'मिट-द-प्रेस'ला केली आहे. या पृष्ठभूमीवर पतंजलीचा हा प्रस्तावित प्रकल्प अकोल्यात उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. संजय खडक्कार यांनी केली आहे. व्यापारी व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अकोला शहरात कापसावर आधारित उद्योग उभारण्यास बराच वाव आहे. 'पतंजली' समूहाचा प्रस्तावित स्वदेशी जिन्स प्रकल्प अकोल्यात उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यायला हवा. - डॉ. संजय खडक्कार, माजी सदस्य विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, अकोला.
पतंजलीचा ‘स्वदेशी जिन्स’ प्रकल्पासाठी अकोला ठरू शकते केंद्र !
By admin | Published: September 15, 2016 2:12 AM