लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महाराष्ट्राला भरघाेस मदत केली, व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले, ऑक्सिजन दिला, मात्र आघाडीचे नेते त्याचा उपयाेग करण्याऐवजी कांगावा करत आहेत. त्यांनी काम करावे, माेदीजींना मी महाराष्ट्राची परिस्थिती सांगत असताे, मदतही मागत असताे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहावे, असा सल्ला देणाऱ्या कांगावेखाेरांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर पलटवार केला आहे.
अकाेल्यातील काेविड रूग्णांची स्थिती व उपाययाेजना याबाबत आढावा घेण्यासाठी फडणवीस रविवारी अकाेल्यात आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साेनिया गांधी यांना पत्र लिहून फडणवीस केंद्राच्या अपशयावर पांघरूण घालत आहेत. त्यांनी माेदींना पत्र लिहून महाराष्ट्राची खरी स्थिती सांगावी, असा सल्ला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिला हाेता. त्याचा समाचार घेताना फडणवीस यांनी पटाेले यांचे नाव न घेता, कांगावेखाेर असा पलटवार केला आहे. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत. त्यामुळे अनेक व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी राहिल्या. ही मशीन आहे चार-चार महिने पडून राहत असेल तर यामध्ये काही दाेष येऊ शकतात. त्या मशीन पडून राहिल्या याला जबाबदार कोण? राज्य शासनाकडे कुशल मनुष्यबळ नाही, त्यामुळे हे व्हेंटिलेटर पडून खराब झाले असतील तर त्याचा दाेष केंद्रावर ढकलून ऑडिट करण्याची राज्य शासनाची भूमिका हा कांगावा आहे, असा आराेप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अकाेल्यातील काेविड उपाययाेजनांमधील समन्वयाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या निधीमधून सुचवलेल्या उपयायाेजनाही तत्काळ प्रस्तावित हाेत नसल्याबद्दल राेष व्यक्त करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डाॅ. संजय कुटे, आमदार गाेवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. मनिषा गजभिये, आदी उपस्थित हाेते.