लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावीची आॅनलाइन केंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे; परंतु अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विज्ञान महाविद्यालयांचाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वी होते की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेसाठीच प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेतून कला व वाणिज्य शाखांना वगळण्यात आले असून, फक्त कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांमध्येच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल; परंतु याला विज्ञान महाविद्यालयांनीच विरोध दर्शविला आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातील विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील आणि शहरातील विज्ञान महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतील, अशी भीती विज्ञान महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील अनेक शिकवणी वर्ग संचालकांचे कनिष्ठ महाविद्यालये असल्याने, त्यांनीसुद्धा केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे आमच्याच शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होणार असल्याने, शिकवणी वर्ग संचालकांची या केंद्रीय प्रवेश पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर आमच्या महाविद्यालयांमध्ये आम्ही केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवू देणार नाही, अशी भूमिका काही शिकवणी वर्ग संचालकांनी घेतली आहे. शिक्षण विभाग केंद्रीय पद्धतीची प्रवेश प्रक्रिया शहरातील ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविणार आहे; परंतु त्याला महाविद्यालयांनी विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध कशासाठी?शिक्षण विभागाने प्रथमच शहरात अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशपत्रिका विक्रीला ब्रेक लागणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या शिक्षण शुल्काचीसुद्धा शिक्षण विभागाला माहिती द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांनाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना पैसा मिळणार नाही. प्रवेशपत्रिका वितरणातून महाविद्यालयांची कमाई थांबणार असल्याने, महाविद्यालयांकडून केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध होत आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून संमतिपत्र मागविण्यात आले आहेत. काही महाविद्यालयांनी संमतिपत्र दिले नाहीत. तरीसुद्धा सर्वच महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. -प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी
केंद्रीय प्रवेश पद्धतीला महाविद्यालयांचाच विरोध!
By admin | Published: May 22, 2017 1:04 AM