- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अशिक्षित आदिवासी खातेदाराला अंधारात ठेवून त्याच्या नावावर पाच लाखांचे कर्ज काढून प्रत्यक्षात केवळ एक लाख दिल्याच्या तक्रारीने सेंट्रल बँक आॅफ इंडिया अडगाव शाखा वादात सापडली आहे. लीड बँकेने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या बेली येथील शांतिलाल गवते या आदिवासी व्यक्तीने अडगाव बु. येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतले. निवृत्ती आणि चेतन नामक दोन फायनान्स एजंटच्या माध्यमातून हे कर्ज घेण्यात आले. गवते यांच्या नावाने पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले; मात्र प्रत्यक्षात गवतेंना केवळ एक लाख रुपये देण्यात आले. ही गंभीर बाब गवते यांना समजल्यानंतर त्यांनी १८ आॅक्टोबर २०१९ रोजी सेंट्रल बँकेच्या वरिष्ठांकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली. गवते यांनी तक्रार केल्याची माहिती कळताच फायनान्स एजंट आणि बँकेचे शाखाधिकारी राजेश शिंगारी यांनी राजकीय पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून सावरासावर सुरू केली. कागदोपत्री प्रकरण दडपण्याचे सर्व प्रयोग सुरू झाले आहे. याच कारणामुळे तक्रारकर्ता गवते यांनी केलेली तक्रार मागे घेतली. माझा कुणावरही कोणताही आक्षेप नसून, मीच पाच लाखांचे कर्ज घेतल्याचा खुलासा सेंट्रल बँक आणि पोलिसांकडे केला आहे. तक्रारकर्त्याने माघार घेतली असली तरी राष्ट्रीयीकृत बँकेत होत असलेला सावळा गोंधळ लक्षात घेत लीड बँकेने याची गंभीरतेने चौकशी सुरू केली आहे. अडगाव येथील बँक मॅनेजर राजेश शिंगारी, फायनान्स एजंट आणि तक्रारकर्त्याचे जबाब नोंदविले जात आहे. सोबतच त्या काळातील आॅडिट रिपोर्टदेखील तपासले जात आहे.
२० ते २५ खातेदारआदिवासींच्या नावे अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊन त्यांना नाममात्र रक्कम दिल्या जात असून, असे २० ते २५ खातेदार असल्याची परिसरात चर्चा आहे. यानिमित्ताने त्या दिशेनेदेखील लीड बँकेने चौकशी करून सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.