अकोला: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन कैदी अमोल देवकर फरारप्रकरणी अकोला मध्यवर्ती कारागृहातील कारागृह रक्षक राजेश डाबे यांना निलंबित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी चंद्रपूर येथील कारागृहाच्या अधिकार्यांकडून करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, त्यांनी मंगळवारी तिघांची चौकशी केल्याची माहिती आहे. पातूर तालुक्यातील अंधारसावंगी येथील बलात्कारप्रकरणात कारागृहात न्यायाधीन कैदी असलेला अमोल देवकर हा कारागृहातील १८ फुटाच्या भिंतीवरून उडी घेऊन फरार झाला होता. सिटी कोतवाली पोलिसांनी अमोल देवकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. देवकर याला कारागृहातून पळून जाण्यासाठी बरॅक क्रमांक १ मधील १७ कैद्यांपैकी माळी नामक कैद्याने मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे अमोल देवकर फरार प्रकरणाची चौकशी शासनाने चंद्रपूर कारागृहातील अधिकार्यांकडून सुरू केली आहे. या अधिकार्यांनी मंगळवारी अकोल्यात दाखल होऊन मध्यवर्ती कारागृहातील कारागृह रक्षक राजेश डाबे, फरार झालेला कैदी अमोल देवकर व त्याला मदत करणारा माळी या तिघांची कसून चौकशी केली. या प्रकरणात प्राथमिक स्तरावर कारागृह रक्षक राजेश डाबे यांना दोषी ठरवित त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच या प्रकरणात कारागृह अधीक्षक यांचीही कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मध्यवर्ती कारागृह रक्षक राजेश डाबे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 1:47 AM