अकोला : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली असून, लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८,६२,१९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.रेल्वेने १२ मे २०२० पासून १५ जोड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जून २०२० रोजी निवडक विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली. तेव्हापासून अनेक वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. तिकिटांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी उघडलेल्या दलालांविरुद्धच्या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८,६२,१९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून ६,०९,२९८ किमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त केली आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त, या कोविड-१९ साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पाकिटांचे वितरण त्यांनी केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा दिव्यांग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.