अकोला : ग्राहकांना अचूक व तत्पर वीज देयक देण्यासाठी महावितरणने राज्यात १ आॅगस्टपासून केंद्रीकृत देयक प्रणाली सुरू केली असून, ही प्रणाली यशस्वीरीत्या राबविण्याकरिता महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि बिलिंग एजन्सी यांनी या संदर्भातले अद्ययावत ज्ञान अवगत करून, नियोजनासोबत सामूहिकपणे यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले.महावितरणच्या अकोला परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी व बिलिंग एजन्सी यांची ‘केंद्रीकृत (सेंट्रलाइज) बिलिंग प्रणालीचे नियोजन व अंमलबजावणी’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आॅगस्ट महिना हा महत्त्वपूर्ण व क्रांतीचा महिना असून, या महिन्यापासून सुरू झालेली ही बिलिंग प्रणाली म्हणजे महाक्रांतीकारी बदल असल्याचे डॉ. मुरहरी केळे यांनी सांगितले. महावितरणची वाटचाल डिजिटलच्या दिशेने सुरू असून, या नवीन पद्धतीमुळे ग्राहकांचे रिडिंग दर महिन्याला ठरविलेल्या एकाच तारखेला होऊन दुसऱ्या दिवशी देयकाचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाºयांचा गौरव करण्यात येईल. मात्र, चुकीचे काम करणाºयांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य अभियंता यांनी दिला. त्यामुळे सर्वांनी ही बिलिंग प्रणाली यशस्वी करून ग्राहकांना वेळेत व दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन शेवटी मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले.या कार्यशाळेला अधीक्षक अभियंते गुलाबराव कडाळे, विनोद बेथारिया आणि पवनकुमार कछोट यांच्यासह अकोला, बुलडाणा आणि वाशिम मंडलातील प्रणाली विश्लेषक, सर्व कार्यकारी अभियंते, उप विभागीय अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा, बिलिंग एजन्सीचे प्रतिनिधी यांच्यासह सुमारे ३०० जणांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वांनी अकोला परिमंडळात ही देयक प्रणाली यशस्वीपणे अंमलबजावणी करून दाखवण्याचा मानस व्यक्त करून, सर्वच निकषावर अकोला परिमंडळ पुढे राहील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी करून सर्वांचे आभार मानले.तज्ज्ञांकडून शंकांचे निरसणया कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दहेदर यांनी ‘केंद्रीकृत बिलिंग प्रणाली, गरज, नियोजन व अंमलबजावणी’ या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली, तर उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे तांत्रिक बाबीची संपूर्ण माहिती देत उपस्थितांनी विचारलेले प्रश्न, शंकांचे निरसण केले.