अकोला : केंद्र सरकार हे ओबीसींविरोधी सरकार आहे. त्यामुळेच ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. २०१७ पासून ते आजपर्यंत या धोरणामुळे ११000 ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसीला कायद्यानुसार दिलेले २७ टक्के आरक्षणाची पूर्तता नीट द्वारे दिलेल्या वैद्यकीय प्रवेशामध्ये झालेली नाही. देशपातळीवरील आॅल इंडिया फेडरेशन आॅफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी विस्तृत अशी आकडेवारी जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट उघड केला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आॅल इंडिया हा नॅशनल इलिजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एन.ई.ई.टी.) मार्फत भरल्या जात असून, केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्यक असणारे आरक्षण सन २०१७ पासून कमी केले आहे व त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे; परंतु केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट आॅफमध्ये बदल घडवून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र २०१७-१८, २०१९-२० या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ओबीसीचे ११ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. वस्तुत: भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरुस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे; परंतु केंद्र सरकार हे ओबीसींचे हक्क डावलणारे सरकार असून, आरक्षणच संपविण्याचा घाट या संस्थेने घातला असल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितकडून आंदोलनाचा इशाराओबीसींना हक्क असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल. वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील अन्याय सरकारने तत्काळ दूर करावा, अन्यथा कोरोनाची भीती बाजूला ठेवून आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांना आंदोलनाची हाक देऊ. वंचितच्या बॅनरखाली हे आंदोलन करणार असून, जेवढे आरक्षणवादी आहे ते सर्व या आंदोलनाला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिनी सैनिक मागे गेले, पुढे किती आले होते?भारत आणि चीनमधील तणाव ही नुरा कुस्ती आहे, असे मी मागेच म्हणालो होतो. आता चिनी सैन्य दोन किमी मागे सरकले, असे सरकार सांगत आहे. सरकारने चिनी सैनिक किती पुढे आले होते, याचेसुद्धा जनतेला स्पष्टीकरण द्यावे. उगाच माहिती लपविण्याचा प्रयत्न करू नये, असे आव्हान अॅड. आंबेडकर यांनी सरकारला दिले.
राज्य सरकार पडणार नाही-आंबेडकरराज्य सरकारमधील विविध पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्या तरी सरकार पडणार नाही, असे दिसते. कोणत्याच आमदाराला आता निवडणुका नकोत. त्यामुळे आमदारांच्या दबावात हे सरकार चालेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले. सरकार कधी पडेल, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतील. ते ज्योतिषी आहेत, मी नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.