अच्युत महाराज बोरोडे यांची नियुक्ती
वडाळा देशमुख : येथील युवा कीर्तनकार अच्युत महाराज बोरोडे यांची विश्व वारकरी सेनेच्या जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी त्यांची नियुक्ती केली. यावेळी विठ्ठल महाराज खलोकार, विक्रम महाराज, सोपान महाराज, गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी मंडळी उपस्थित होती.
माळेगाव परिसरात उन्हाळी तिळांची लागवड
हिवरखेड : परिसरातील माळेगाव बाजार येथील प्रयोगशील शेतकरी सुशील वसंतराव चिकटे यांनी दोन एकर शेतात उन्हाळी तिळाची लागवड करून शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी लागवड केलेले तिळाचे पीक चांगले बहरले असून, तीळ पिकाची पाहणी करण्यासाठी परिसरात शेतकरी शेताला भेट देत आहेत.
वाडेगाव ग्रामपंचायतीची ऑनलाइन मासिक सभा
वाडेगाव : वाडेगाव ग्रामपंचायतीची ऑनलाइन सभा नुकतीच पार पडली. कोरोनामुळे बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांची ऑनलाइन सभा घेण्यात आली. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी मांडले.
बार्शीटाकळी तालुक्यात लसीकरणाला प्रतिसाद
बार्शीटाकळी : कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहेत. बार्शीटाकळी तालुक्यात आतापर्यंत ३ हजार २४७६ नागरिकांना लस देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश राठोड यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षे व ६० वर्षे वयोगटांतील नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. लसीकरण मोहीम पुढे सुरू ठेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल
बाळापूर : शेजारी राहणाऱ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन हाणामारी झाली. इंदिरानगरातील शहेनाजबी सै. जमीर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राधाबाई सुनील डोंगरे व सुनील डोंगरे यांच्याविरुद्ध तर राधाबाई डोंगरे यांच्या तक्रारीनुसार अनिल ऊर्फ अन्नू सय्यद अमीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोखंडी पाइपची चोरी, गुन्हा दाखल
बाळापूर : पारस येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून मिळणाऱ्या राखेची वाहतूक करताना, वाहनात प्रकल्पातील लोखंडी पाइपची चोरी करणाऱ्या इमरान शाह तकदीर शाह, राजीक शाह सोनू शाह रा. चोहोट्टा बाजार यांच्याविरुद्ध सुरक्षा अधिकारी गोकुळ मोरे यांच्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी बुधवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.
वंदेमातरम् पथकाद्वारे अंत्यसंस्कार
मूर्तिजापूर : कोरोनाबाधित दोन रुग्ण लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन मृतदेहांवर नातेवाइकांच्या उपस्थितीत वंदेमातरम् आपत्कालीन पथकाच्या स्वयंसेवकांनी अंत्यसंस्कार केले. कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वंदेमातरम् पथकाने पुढाकार घेतला आहे.