अकोला : शालेय विद्यार्थ्यांना शिकवताना, शिक्षकांनी विविध प्रयोग करावेत. हसतखेळत विद्यार्थ्यांना शिकवून कठीण वाटणारा विषय सोपा करून सांगता यावा, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. जिल्ह्यातून ९४४ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती भरण्यासाठी शिक्षकांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. विद्यार्थी कॉन्व्हेंट संस्कृती सोडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळले पाहिजे. या दृष्टिकोनातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व विद्या प्राधिकरणामार्फत आॅनलाइन अविरत प्रशिक्षण घेण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांकडून शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित काही विषयाचे प्रश्न, काही प्रयोग देण्यात येतात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर शिक्षक पुढील टप्पा गाठतात. जिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी ९५० शिक्षकांनी नोंदणी केली होती. पैकी ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षित शिक्षकांना आता आॅनलाइन प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांकडून देवनागरी लिपीत आॅनलाइन माहिती मागविली आहे. ही माहिती शिक्षकांना ३१ आॅगस्टपर्यंत संकेतस्थळावर भरण्यासाठी मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ९४४ शिक्षकांना अविरत अॅपच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. आता त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना आॅनलाइन माहिती सादर करायची आहे. त्यांनी माहिती भरली तरच प्रमाणपत्र मिळेल.- समाधान डुकरे, जिल्हा समन्वयक,सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास