सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील नामदेव तुकाराम काळे यांच्या मालकीचे शेत सर्व्हे नं. २८६ च्या क्षेत्रात रा.मा.क्र. एन/ए/पी/३४ रुस्तमाबाद/२/२००२-०३ च्या मंजुरीनुसार अकृषक प्लाॅटचा फेरफार नमुना ९ च्या नोटीसवर मालकी हक्क असणाऱ्याची स्वाक्षरी नसतानाही संबंधित महसूलचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करून ३५ प्लाॅटधारकांच्या नावे प्लाॅटची नोंद केल्याची तक्रार नामदेव काळे यांनी ११ डिसेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, तक्रारकर्त्यांनी सर्व फेरफार रद्द करण्यासाठी २०१७ मध्ये मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला; परंतु अद्यापही कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्याने तहसीलदारांकडे निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच १५ दिवसांत फेरफार रद्द करून न्याय द्यावा अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्या करण्याचा इशारा नामदेव काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
--------------------------------
रुस्तमाबाद येथील नामदेव काळे यांच्या प्राप्त अर्जाबाबत मंडळ अधिकाऱ्याकडून अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर चाैकशी करून कारवाई करण्यात येईल.
-संतोष यावलीकर, प्रभारी तहसीलदार, बार्शीटाकळी.