अकोला-लोणी रस्त्यावरील नव्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजारात स्थानांतरित होऊन तेथे ठोक भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले साखळी उपोषण मंगळवारी समाप्त झाले. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी उपोषणकर्त्यांना जनता भाजी बाजारातील हर्राशी बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण समाप्त करण्यात आले. जुन्या जनता भाजी बाजारात प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना होलसेल भाजीपालाची हर्राशी केल्या जात असून प्रशासनाचे संकेत पायदळी तुडविण्यात येत आहेत. यामुळे लोणी रस्त्यावरील या नव्या भाजीपाला बाजारातील भाजीपाला गाळेधारकांवर अन्याय होत आहे. मनपा प्रशासनाच्या या नाकर्तेपण विरोधात या नव्या मुख्य भाजी बाजारातील अडते,गाळेधारक व भाजी व्यावसायिकांनी दिनांक १ जानेवारी पासून आपल्या कुटुंबासमवेत साखळी उपोषणास प्रारंभ केला हाेता. या उपोषणात संस्थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्यक्ष प्रशांत चिंचोलकार, संचालक संतोष अंबरते,अनंत चिंचोलकर,गणेश घोसे,अनिल गोलाईत,शिवा पल्लाडे,राजेश ढोले,अमोल गोलाईत,योगेश चापके,संजय कोकाटे,गजानन कातखेडे,राजेश ढोंमने,सौ.सुलभा अंबरते,श्रीमती नंदा गोलाईत समवेत सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार भाजीपाला घाऊक व्यावसायिक,अडते,ओटेधारक व गाळेधारक आदी उपस्थित होते.
भाजीपाला व्यावसायिकांचे साखळी उपोषण समाप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:56 AM