अकोला: महापालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी मनपाच्या विविध विभागातील कामकाजाचा आढावा घेत प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचे निर्देश सोमवारी दिले.मनपात स्थायी समितीच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुख,कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती सतीश ढगे यांनी जलप्रदाय, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, विधी विभाग, मलेरिया विभाग, आरोग्य व स्वच्छता विभाग, बाजार व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, नगररचना विभाग, शिक्षण विभाग, मोटर वाहन आदी विभागातील कामकाजाची इत्थंभूत माहिती घेतली. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शहरात बहुतांश भागात पिवळसर पाणी येत असून, त्यामध्ये तातडीने सुधार करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले. यावेळी अमृत योजनेंतर्गत नवीन पाइपलाइन तसेच जलकुंभ उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर अर्चना मसने, उपायुक्त रंजना गगे, शहर अभियंता सुरेश हुंगे, मुख्य लेखा अधिकारी मनजीत गोरेगावकर, नगररचनाकार उदय तारळेकर, नगरसचिव अनिल बिडवे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.