लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर २००७ पासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठित केली आहे. आरोग्यसेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची किती उपयुक्तता आहे, हे या अभ्यास समितीला पटवून देण्याचे आव्हान आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघापुढे असून, त्यानुषंगाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करण्याच्या कामात संघटना गुंतली आहे. अहमदनगर येथे गत आठवड्यात पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘एनएचएम’ अभियानांतर्गत असलेल्या विविध योजना राबविण्यासाठी आरोग्य विभागातील विविध आस्थापनांमध्ये राज्यभरात तब्बल २२ हजार अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. ‘समान काम-समान वेतन’ आणि विनाशर्त शासकीय सेवेत समायोजन या दोन प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ही संघटना २०१२ पासून संघर्ष करीत आहे. संघटना करीत असलेल्या आंदोलनांची दखल घेत आता सार्वजनिक आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित स्वरूपात सामावून घेण्याबाबत विचार करण्याकरिता आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अभ्यास समिती गठित केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष आणि सचिव या दोघांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. सदर समिती कर्मचाऱ्यांकडून निवेदने प्राप्त करून घेऊन त्यांच्यासोबत सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आहे. यानुषंगाने एनएचएम कर्मचाऱ्यांची राज्यपातळीवरील संघटना राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती, पदनिहाय संख्या, कोणत्या वर्गवारीत किती कर्मचारी आहेत, त्यांचा पगार किती, अशी सविस्तर माहिती गोळा करण्यात गुंतली आहे. याशिवाय ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका, एएनएम यांची दुर्गम भागातील उपयुक्तता पटवून देण्यासाठी संघटना त्यांची संपूर्ण माहिती गोळा करीत असल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.अभ्यास समितीत सहसंचालकांचा समावेशशासनाने गठित केलेल्या समितीत आता सदस्य सचिव म्हणून सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय, आरोग्य अभियान, मुंबई यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने शनिवार, १ जुलै रोजी जारी केले.अभ्यास समितीपुढे ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपयुक्तता पटवून देण्यासाठी संघटना कामाला लागली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती गोळा झाल्यानंतर ती समितीपुढे सादर करण्यात येईल. - गोपाल अंभोरे, विभागीय अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ.
‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपयुक्तता पटवून देण्याचे आव्हान
By admin | Published: July 03, 2017 2:01 AM