अकोला : गेल्या वर्षभरात एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे मोठे नुकसान पहावे लागले. आताही हवामानामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कडाक्याचा उन्हाळा कुठे जाणवायला लागला असताना आता पावसाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. विदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अशातच दिवसा ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा पारा घसरला. गत ३-४ दिवसांपासून मध्य प्रदेशातील विशेषतः पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाची गतीविधी सुरू आहे. या विस्तारीत सिस्टीममुळे राज्य आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रात ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या तापमानात किंचित घट, संध्याकाळी वादळ, गडगडाट आणि पावसाचा अनुभव सीमावर्ती प्रदेशात आला आहे. आजच्या उपग्रह छायाचित्रानुसार, अमरावती (मेळघाट), अकोला, वाशिम, जालना, बुलडाणा, औरंगाबाद, जळगाव, सोबत परभणी, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, असे वातावरण पुढील ३-४ दिवस सक्रिय राहू शकते.
पुढील चार-पाच दिवसांत वादळी पावसाची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाची काढणी करून घ्यावी अथवा शेतमाल झाकून ठेवावा.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक