अकोला : नागपूर येथील हवामान विभागाच्या संदेशानुसार शुक्रवार, ११ जूनपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात वीज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी, असा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत सोमवारी देण्यात आला.
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, वीज व वादळापूर्वी संगणक, टेलिव्हिजन आदी विद्युत उपकरणे बंद करून स्त्रोतापासून अलग करून ठेवावीत. विजा चमकत असताना मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफार्मरजवळ थांबू नये, तसेच अशावेळी मोबाईलचा उपयोग करू नये, पूरस्थितीमध्ये नदीचा पूर पाहण्यासाठी नदी काठावर जाऊ नये, पुलावरून पाणी वाहत असतना पूल ओलांडू नये, पूरस्थितीमध्ये जाण्याचा व पोहण्याचा प्रयत्न करू नये, पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.