अकोला : यावर्षी उन्हाळ्यात सतत वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात ७ ते १० मे दरम्यान वीज पडणे, गारपीट, अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मध्य भारतातील हवेचा कमी दाबाचा पट्टा, तापमानवाढीसोबत अधिक निरंतर सक्रिय आहे. जमिनीपासून दीड ते तीन किमी अंतरावर आर्द्रतेचे प्रमाण ६० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे. शुक्रवारच्या उपग्रह छायाचित्रानुसार कर्नाटक, तेलंगणा, गोवा सीमा परिसरातील तालुक्यात वातावरण ढगाळलेले आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर ते बुलडाणा पार सातपुडापर्वत रांगेपर्यंत पावसाची प्रणाली सक्रिय होताना दिसत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळलेले आहे. त्यामुळे ७ ते १० मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मॉन्सूनपूर्व, वळवाचा पावसाचा कालावधी साधारणपणे १५-३० मेपर्यंत असतो. वातावरणात होणाऱ्या सलग बदलामुळे गेल्या महिन्यापासून वातावरण सतत ढगाळलेले आहे. ही परिस्थिती पुढेही कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. सततच्या पावसाने तापमानात घट होवू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक