अकोला: बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यावर्षीही कृषी विभाग, विद्यापीठाला दक्ष राहावे लागणार असून, यासाठी पीक पॅटर्न बदलविण्यासाठीची जबाबदारी कृषी विभागाने स्वीकारावी, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी केले.बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन मोहीम-२०१९ अंतर्गत कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांसाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात विदर्भस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डवले बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते, तर महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय वाघमारे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नागपूर विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.डवले म्हणाले, बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण यशस्वी ठरलो; पण आता गाफील राहून चालणार नाही. तसेच नवीन अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान आपणासमोर आहे. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी सर्व उपाययोजना करा, फरदडीचा कापूस घेऊ नका, कामगंध सापळे वापर वाढवा, शेतकऱ्यांना यथोचित मार्गदर्शन करा, असे आवाहन करताना यावर्षीदेखील सावधगिरीचा उपाय म्हणून कापसाचे बियाणे मे महिन्यानंतरच बाजारात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व हंगामी कापसाची पेरणी शेतकऱ्यांनी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाले यांनी यावर्षीही बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठीचे नियोजन करण्यासाठी ही कार्यशाळा बोलाविण्यात आल्याचे सांगितले.