अकोला : महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रासह राज्यात व महापालिकेत मोठ्या अभिमानाने सत्ता असण्याचा गवगवा करणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात मनपाची वाटचाल अतिशय बिकट झाली असून, प्रशासकीय कारभार ताळ््यावर आणण्यासाठी मनपा आयुक्त वाघ धडपड करताना दिसत आहेत. मंगळवारी मनपाच्या स्तरावर उपलब्ध असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपायुक्तांसह विविध विभागाचा अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.महापालिकेतील दोन्ही उपायुक्त पदे मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी तत्कालीन मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता. मुख्य लेखाधिकारी सोळसे यांचे निधन झाल्यानंतर हे पदही रिक्त होते. परिणामी मनपाचा आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प झाला होता. यासंदर्भात ओरड झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी नगर विकास विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर पीडीकेव्हीतील वित्त नियंत्रक विद्या पवार यांच्याकडे मुख्य लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. सद्यस्थितीत उपायुक्त प्रशासन आणि उपायुक्त विकास ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, नगररचनाक ार विजय इखार प्रदीर्घ रजेवर गेले. त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचनाकार संजय पवार यांच्याकडे सोपवून वेळ निभावल्या जात आहे. अशा बिकट परिस्थितीमुळे प्रशासनाचा सर्व भार एकमेव आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या खांद्यावर आला आहे. रिक्त पदांसंदर्भात नगर विकास विभागाकडे वारंवार पत्र, शिफारशी केल्यानंतरही शासन निर्णय घेत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. असे असले तरी कामकाज थांबवता येत नसल्यामुळे नाईलाजाने मनपा आयुक्त वाघ यांनी स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विश्वास दर्शवित प्रशासनाचे गाडे हाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच मंगळवारी प्रशासनात खांदेपालट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते.
मनपाकडे डॉ. दीपाली भोसलेंचा पर्याय!आजरोजी मनपात शासनाचे अधिकारी म्हणून केवळ आयुक्त जितेंद्र वाघ व सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले कार्यरत आहेत. डॉ. भोसले यांचा परिविक्षाधीन कालावधी संपुष्टात येण्यास काही दिवस शिल्लक आहेत. प्रशासनाकडे इतर कोणताही पर्याय नसल्यामुळे डॉ. भोसले यांच्याकडे उपायुक्त (सामान्य प्रशासन विभाग) पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे उपायुक्त (विकास) पदाचा अतिरिक्त पदभार दिला असून, मुख्य लेखा परीक्षक एम.बी. गोरेगावकर यांच्याकडे शिक्षणाधिकारी तसेच दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर यांच्याकडे पश्चिम झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार देण्याचा निर्णय घेण्यात आला.