लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील पथदिव्यांची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासन सतत निरनिराळे प्रयोग राबवित आले आहे. त्यासाठी कंत्राटदारही बदलण्यात आले. तरीही शहरातील मुख्य रस्ते, राष्ट्रीय महामार्गांवरील अंधाराचे साम्राज्य कायम असल्याचे चित्र आहे. संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विद्युत विभागाला कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसून येते. महापालिका क्षेत्रात पथदिव्यांची समस्या पाचविला पुजली आहे. सोडियम पथदिव्यांमुळे मनपाच्या विद्युत देयकांत भरमसाठ वाढ होत असल्याची सबब पुढे करीत २00६ मध्ये शहरातील मुख्य मार्गांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर सीएफएल पथदिवे लावण्यासाठी एशियन नामक कंपनीसोबत करार करण्यात आला. सुरुवातीला काही महिने सुरळीत चालणारा कंपनीचा कारभार नंतर डळमळीत झाला. मनपाकडून देयक मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगत कंपनीने पथदिवे दुरुस्तीसाठी हात आखडता घेतला. त्यामुळे पथदिव्यांची समस्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ झाली. पथदिव्याच्या एका पंजात सीएफएलच्या चार नळ्य़ांऐवजी दोन किंवा चक्क एका नळीच्या प्रकाशात काम भागवणे सुरू झाले. परिणामी अकोलेकरांवर अंधूक उजेडाचा सामना करण्याची वेळ आली. २0१२ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन पदाधिकार्यांनी खिसे भरण्याच्या उद्देशातून पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी अक्षरश: प्रभागनिहाय कंत्राटांची खिरापत वाटली. हा प्रकार महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रभागनिहाय कंत्राट रद्द करून झोननिहाय कंत्राट जारी केले. स्थानिक कंत्राटदारांनी काम स्वीकारल्यानंतर काही दिवस नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारी कमी झाल्या. नंतर पुन्हा पथदिव्यांची समस्या निर्माण झाली. ही डोकेदुखी पाहता प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रकाशित केली असता बाहेरगावच्या कंत्राटदारांनी सादर केलेल्या निविदा प्रशासनाने मंजूर केली. पथदिव्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले जात असतानाच आता पुन्हा एकदा मुख्य रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे.
विद्युत विभाग झोपेतशहरातील पथदिवे दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला दिला जाणारा पैसा अकोलेकरांच्या खिशातून वसूल केला जातो. अर्थातच, पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणार्या कंत्राटदाराच्या कामकाजावर मनपाच्या विद्युत विभागाने करडी नजर ठेवणे अपेक्षित आहे. खदान पोलीस ठाणे ते नेहरू पार्क चौक, ते सिव्हिल लाइन रोड, नेहरू पार्क चौक ते आरडीजी महाविद्यालय ते पीडीकेव्ही, कमला वाशिम बायपास चौक ते बाबासाहेब धाबेकर फार्म हाऊस, वाशिम बायपास रोड, बिर्ला क ॉलनी आदींसह विविध भागात बंद पथदिवे पाहता विद्युत विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसून येते.-