आलेगाव : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चरणगाव येथे ५ जानेवारी रोजी झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटात जातीय दंगल झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटाच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या दोन आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. दरम्यान गावात दंगल घडवणारे मुख्य सूत्रधारापर्यंत चान्नी पोलिस अजूनही पोहचले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.चरणगाव येथे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात एका जागेवर झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यामध्ये काही जण जखमी सुद्धा झाली होती. दोन गटातील परस्पर तक्रारीवरून एकूण ७८ सह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाले होते. त्यापैकी ७४ आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या ७८ आरोपी पैकी चार आरोपी फरार होते. त्यापैकी वरणगावातील सुनील देवराम इंगळे(४०) व सुभाष गंगाराम इंगळे(५५) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींची अकोला येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान चरणगावत दंगल घडवणारे मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे.चरणगाव दंगल प्रकरणातील ७४ आरोपींना अटक केली होती. फरार असलेले इतर आरोपी पैकी सुनील देवराम इंगळे सुभाष गंगाराम इंगळे या दोन आरोपींना शनिवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे लवकरच त्यांना अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.प्रकाश झोडगे,ठाणेदार चान्नी
चरणगाव दंगल : फरार दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 5:52 PM