अकोला: वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समावेश केला जाईल. असा शब्द उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. प्राध्यापकांना मिळणारे मासिक वेतन महिन्याच्या निश्चित तारखेला मिळावे यासाठी त्यांचा शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समावेश केला जाणार आहे.शिक्षक नेते शेखर भोयर यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मंगळवारी मंत्रालयात भेट घेऊन तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शिक्षण मंत्री तावडे यांनी तासिका तत्त्वावरील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा समावेश शालार्थ वेतन प्रणालीमध्ये केल्या जाईल, असे आश्वासन दिले. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये बहुसंख्य प्राध्यापक हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांना घड्याळी तासाप्रमाणे मिळणारे मानधन २४0 रुपये प्रति तासिका इतके होते. या मानधनामध्ये वाढ करून घेण्यात शेखर भोयर यांनी यश प्राप्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे. कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या जागा रिक्त झाल्यास त्या जागी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)