रोहनखेड : अकोट तालुक्यातील बांबर्डा येथे स्वस्त धान्य दुकान संकल्पना महिला बचत गटाकडे होती. बचत गटातील संगीता पंजाब शिरसाट, कुटासा येथील विनोद डाबेराव हे दोघेजण संगनमत करून स्वस्त धान्य दुकान चालवीत असून, दोघेजण ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप करीत बांबर्डा येथील काही ग्राहकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला व तहसीलदार, अकोट यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, ३१ मे रोजी अकोट पुरवठा विभागाचे निरीक्षक गौरव राजपूत यांनी बांबर्डा येथे भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात रेशनकार्डधारकांचे जबाब नोंदविले होते. याबाबत ‘लोकमत’ २ जून रोजी बातमी प्रकाशित करताच पुरवठा विभागाने दखल घेत दि. २ जुलै रोजी स्वस्त धान्य दुकानाचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
अकोट पुरवठा विभागाचे निरीक्षक गौरव राजपूत यांनी बांबर्डा येथे भेट दिली असता, २३ रेशनकार्डधारकांनी रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रार केली होती. त्या तक्रारीत एका महिलेकडून नवीन रेशनकार्ड बनविण्यासाठी चार हजार रुपये दुकानदारांनी घेतल्याचा आरोप तक्रारीतून केल्यामुळे कुटासा येथील विनोद डाबेराव यांनी धमकी दिली होती. या प्रकरणात दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये दि. ३१ मे रोजी संगीता पंजाब शिरसाट, विनोद डाबेराव या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. बांबर्डा येथील रेशन दुकानाचा परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. ‘बांबर्डा येथील रेशन दुकानाची तपासणी’ अशी बातमी २ जून रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच त्याची दखल घेत बांबर्डा येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना अखेर निलंबित झाला, असा आदेश अकोला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अकोट येथील पुरवठा विभागात स्वस्त धान्य दुकानाचा निलंबनाचा प्रस्ताव २ जुलै रोजी पाठवण्यात आला.
------------------------------------
बांबर्डा येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित झाला असा प्रस्ताव अकोला जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असून, दोन दिवस तहसीलला सुट्टी असल्याने सोमवारी कारवाई करण्यात येईल.
- मनोज मानकर, प्रभारी पुरवठा निरीक्षक अकोट.
--------------------------------
दुकान क्रमांक ६२ बांबर्डा येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात येत असून, बांबर्डा येथील कार्डधारक ग्राहक धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी दुकान नजीकच्या रास्त भाव दुकानास जोडण्याबाबत आदेश दिला आहे.
-बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला.