बार्शिटाकळी : तालुक्यातील शेलगाव(बोरमळी) येथील रास्त धान्य दुकान क्रमांक ७३ चे दुकानदार प्रकाश सखाराम जाधव यांनी गेल्या महिन्यात शिधापत्रिकाधारकांसाठी पुरवठा विभागाने मंजूर केलेले पीएम योजनेचे मोफत धान्य हे वाटप न करता गायब केल्याची तक्रार शेलगाव येथील ग्रामस्थांनी दि. १३ ऑगस्टला तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार गजानन हामंद यांना दिली. याबाबत रास्त धान्य दुकानदारास विचारणा केली असता जुलै महिन्याचा मोफत धान्याचे वाटप ऑगस्ट महिन्याचे मंजूर कोट्यातून करेल व ऑगस्ट महिन्याचा विक्री कोटा पुढील महिन्यात वाटप करेल, असे सांगितले.
तक्रारीवर संजय जाधव, नितीन पवार, सत्यप्रकाश पवार, किरण पवार, सतीश पवार, महादेव जाधव, नंदू चव्हाण, प्रकाश पवार, योगेश पवार, हिरासिंग पवार, सीताराम राठोड, रंगराव आडे, दासू चव्हाण, उत्तम पवार, सुभाष चव्हाण, सुरेश राठोड, रमेश चव्हाण, जितेश पवार, चंदू आडे, दशरथ भोकरे, मोहन राठोड, प्रशांत पवार, मुकेश राठोड, गजानन राठोड, मनोज आडे, मंगेश मदने, अनिल फरकाळे, बंडू पाटील, विकास पाटील, श्याम राठोड, राम राठोड, अरविंद आडे, राजेश पवार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------
या प्रकरणाची पुरवठा विभागामार्फत समिती नेमून प्रत्यक्ष गावात येऊन चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती येणाऱ्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- गजानन हामंद, तहसीलदार बार्शीटाकळी.
--------------
दुकानाचा परवाना रद्द करावा; अन्यथा आंदोलन
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील काही शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करतेवेळी पावती देताना दुकानदार दिलेल्या रास्त भाव धान्याची किंमत रकमेत दाखवितो. मोफत धान्य न देता त्यामध्येच मोफत धान्य दिल्याचा उल्लेख करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत चौकशी समिती नेमून पुरवठा विभागाने प्रत्यक्ष गावात येऊन शिधापत्रिकाधारकांचे बयान नोंदवावे, तसेच अनियमितता दिसून आल्यास रास्त धान्य दुकान परवाना रद्द करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही ग्रामस्थांनी तक्रारीतून दिला आहे.