खेट्री : पातूर तालुक्यातील राहेर येथे स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून सायवणी येथील स्वस्त धान्य दुकानदारांना जोडण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यापासून सायवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटप करणार आहे.
राहेर येथील स्वस्त धान्य दुकानदार डिगांबर कोरडे हे धान्य दुकानातून धान्याची चढ्या दराने विक्री करून ग्राहकांकडून शासनाच्या नियमानुसार किंमत वसूल न करता जास्त भावाने विक्री करीत असल्याचे व पावती देत नसल्याचा प्रकार सुरू असल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी २२ सप्टेंबर रोजी पातूरच्या तहसीलदारांकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाने २८ सप्टेंबर रोजी राहेर येथील रेशन दुकानदारासह ७५ कार्डधारकांची जबाब नोंदविले होते. गोरगरीब नागरिकांना धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना धान्याचा पुरवठा केला जातो, याबाबत २७ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभाग खडबडून जागा झाला. बाळापूरच्या निरीक्षण पुरवठा अधिकारी अर्चना भगत व पातूरचे पुरवठा निरीक्षक विनीत ताले यांनी २८ सप्टेंबर रोजी राहेर येथे स्वस्त धान्य दुकानदार सह ७५ कार्डधारकांचे जबाब नोंदविले होते. दरम्यान, अनेक त्रुटी आढळून आल्याचे निष्पन्न झाले होते. तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्यावर संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुरवठा विभागाच्या अहवालानुसार पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त केल्याची कारवाई केली होती, परंतु तक्रारकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यावर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी परवाना रद्द केला आहे.
-----------------
राहेर येथील स्वस्त धान्य दुकानदार चढ्या दराने विक्री करीत असल्याबाबतच्या तक्रारीवरून तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या होत्या. तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्या अहवालानुसार वरिष्ठांनी परवाना रद्द केला आहे. वरिष्ठांचा पुढील आदेश येईपर्यंत सायवणी येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्य वाटपाची जबाबदारी सोपवली आहे.
-विनीत ताले, पुरवठा निरीक्षक, पातूर.
---------------------
राहेर येथील स्वस्त धान्य वाटप करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली असून, शनिवारी धान्याची उचल केली आहे. लवकरच कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात येईल.
-इंदुबाई दिगडे, स्वस्त धान्य दुकानदार, सायवणी