अकोला, दि. ३- सोन्या-चांदीचे दागिने चमकवून व साफ करून देण्याच्या नावाखाली दोघा भामट्यांनी महिलेचे दागिने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला. डाबकी रोडवरील गजानन नगरातील गल्ली क्रमांक ५ मध्ये राहणार्या जयश्री दशरथ मोगरे (५0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी दोन भामटे आले. त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे काम करतो. तुमच्याकडे काही सोन्या-चांदीचे दागिने असतील तर आम्ही ते चमकवून देतो, असे सांगितले. त्यामुळे जयश्री मोगरे व त्यांच्या मुलीने दोन भामट्यांना कानातील टॉप्स आणि सोन्याची साखळी चमकविण्यासाठी दिली आणि त्या दोघीही तेथेच बसल्या. भामट्यांनी दागिने चमकविण्याचा बनाव केला आणि हातचलाखीने सोन्याचे दागिने काढून घेतले आणि एका कापडामध्ये त्यांना दागिने बांधून दिले. या दोघी मायलेकींना घरात जाऊन दागिने उघडून पाहिले असता, त्यात काहीच दिसून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत दोन्ही भामटे पसार झाले होते. अखेर जयश्री मोगरे यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार १0 ग्रॅमचे सोन्याचे दागिने भामट्यांनी लंपास केले. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध भादंवि कलम ४२0(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 2:27 AM