लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: केरळ राज्यातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी केरळमधील एका एजंटने पैसे घेतल्यानंतरही तिकिटे पाठविली नसल्यामुळे आपली ४८ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शहरातील एका व्यावसायिकाने कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी तक्रार चौकशीत ठेवली आहे. सिंधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याची गांधी रोडवर दुकान आहे. या व्यापाऱ्याला कुटुंबासोबत केरळला टूरला जायचे असल्याने, त्याने एका एजंटसोबत संपर्क साधला. एजंटने केरळ राज्यामधील पर्यटनस्थळी जाण्यासाठी आॅनलाइन तिकिटे पाठविले, असे सांगून त्यांच्याकडून आॅनलाइनमार्फत स्वत:च्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.या व्यापाऱ्याने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले; परंतु अनेक दिवस उलटूनही तिकिटे मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी संबधित एजंटला फोन लावून विचारणा केली आणि त्याला जाब विचारला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्या व्यापाऱ्याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे; परंतु लवकरच व्यापाऱ्याची तक्रार निकाली काढली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
केरळ टूर्सच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:18 AM