अकोला : समाजकल्याण विभागात नोकरीचे आमिष देऊन बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्रवीण सुरवाडेवर इतर जिल्ह्यांतही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सध्या या प्रकरणातील नीलेश खिल्लारे आणि रेहान खान या दोघांना जामीन मिळाला असून, तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील अक्षय खंडारे या युवकाने खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रवीण सुरवाडे याने नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली होती. या प्रकरणानंतर खदान पोलिसांनी या टोळीतील एक-एक आरोपी ताब्यात घेणे सुरू केले. दरम्यान, आरोपी प्रवीण सुरवाडे याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अकोल्यासह शेजारील जिल्ह्यांतील बेरोजगार युवकांचीही फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारासह बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यातील संध्या प्रवीण सुरवाडे, निर्मला निकम आणि बळीराम गवई ते तीन आरोपी अद्यापही फरारच आहेत.या फरार आरोपींचा शोध खदान पोलीस घेत असून, लवकरच हे टोळके जेरबंद केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बेरोजगारांची फसवणूक ; तीन आरोपी अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:20 PM