- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुदतबाह्य हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन स्टिकर लावून त्याची चढ्या दराने विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयासमोरील औषध व्यावसायिकांकडून हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन स्टिकर लावून खुलेआम विक्री करण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे; मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्यापही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराचे १७ पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. विदर्भातील नागपुरात ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचे संकट आता जवळ आले आहे. अकोल्यातही एका मुलीला कोरोना संशयित घोषित करताच तसेच विदेशातून आलेल्यांवर उपचार सुरू असल्याने या आजाराची दहशत पसरली आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी नागरिक प्रचंड जागरूक झाले असतानाच सॅनिटायजरची खरेदी करण्यात येत आहे. औषध व्यावसायिकांनी याचाच गैरफायदा घेत मुदतबाह्य हॅण्ड सॅनिटायजरच्या स्टिकरवर नवीन मुदतीचे स्टिकर लावून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. औषध व्यावसायिकांनी अकोलेकरांच्या डोळ्यात धूळफेकच सुरू केली असून, याचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनी सुरू केलेला हा प्रकार त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा धसका अन् दुकानदारीकोरोना या गंभीर आजाराचे पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात वाढत असतानाच सेवाभाव विसरलेल्या औषध व्यावसायिकांनी आता सॅनिटायजरच्या माध्यमातून मोठी दुकानदारी सुरू केली आहे. हॅण्ड सॅनिटायजरचे स्टिकर बदलून त्याची खुलेआम विक्री करून औषध व्यावसायिकांनी दुकानदारीच थाटली आहे.
बनावट सॅनिटायजर बाजारातबनावट सॅनिटायजर बाजारात दाखल झाले असून, यावरही नजर ठेवण्याची जबाबदारी आता अन्न व औषध प्रशासन विभागाची राहणार आहे. मुंबईमध्ये १० ते १२ ठिकाणी छापे टाकून बनावट सॅनिटायजर जप्त करण्यात आले आहे. हेच हॅण्ड सॅनिटायजर आता अकोल्यातही विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने आतातरी यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.
विनादेयकाचा गैरफायदासॅनिटायजरची खरेदी करताना देयक घेण्यात येत नसल्याने त्याचाच गैरफायदा घेऊन मुदतबाह्य सॅनिटायजरचे स्टिकर बदलून विक्री सुरू आहे. शुक्रवारी सर्वोपचार रुग्णालयासमोरील एका औषध व्यावसायिकाकडून या सॅनिटायजरची खुलेआम विक्री करण्यात येत होती. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.