अकोला : शहरातील नामांकित असलेल्या कोठारी अॅण्ड सन्सच्या संचालकाने ५६ धनादेशाचे अनादर केल्याप्रकरणी पाचव्या प्रथम श्रेणी न्यायालयाने प्रत्येक संचालकास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच धनादेशाच्या दुप्पट म्हणजेच ५ लाख ३० हजार रुपये दंडही ठोठावला आहे.नवलकिशोर कोठारी अॅण्ड सन्सचे संचालक संतोष नवलकिशोर कोठारी, उषा नंदलाल कोठारी व संगीता जुगलकिशोर कोठारी यांनी व्यवसायाकरिता जनता कमर्शियल को. आॅप बँकेकडे ८ डिसेंबर १९९७ रोजी कॅश क्रेडिटसाठी सादर केलेला अर्ज बँकेने मंजूर केल होता. दरम्यान, बँकेने कोठरी अॅण्ड सन्सला ३१ डिसेंबर २००३ रोजी त्यांची लिमिट व्याजासह १ करोड ३२ लाख ७१ हजार ४८३ पर्यंत पोहोचल्याचे सांगितले होते. ही रक्कम परत करण्याकरिता संचालकांनी २ लाख ६५ हजारप्रमाणे देण्याचे बँकेला सांगून याच बँकेचे दुसऱ्या खात्याचे ५६ धनादेश त्यावेळी दिले होते; मात्र खात्यात रक्कम नसल्याने सदर ५६ धनादेश अनादरित झाले. त्यामुळे बँकेने या प्रकरणात न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर २००४ ते २००८ दरम्यान धनादेश अनादर प्रकरणी ५६ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पाचवे प्रथम श्रेणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकत प्रत्येक संचालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच प्रत्येक धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजेच ५ लाख ३० हजार देण्याचा आदेश दिला. ही रक्कम न दिल्यास अतिरिक्त चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.