जीवघेण्या काेराेनाला आळा घालण्यासाठी २३ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू करण्यात आली हाेती. टाळेबंदी दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन केल्यामुळे काेराेनाचा आलेख घसरला हाेता. ही बाब लक्षात घेता शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथील केली. काेराेना विषाणूबद्दल नागरिकांच्या मनातील भीती दूर हाेताच नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडला. परिस्थिती पूर्ववत हाेत असली तरी दुसरीकडे काेराेनामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे समाेर आले आहे. ही धाेक्याची घंटा लक्षात घेता राज्य शासन अलर्ट झाले असून त्या अनुषंगाने मंगळवारी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा पाेलिस अधीक्षक तसेच महापालिका आयुक्तांसाेबत संवाद साधत काेराेनाचा आढावा घेतला.
महापालिका ‘ॲक्शन माेड’वर
साेशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे नागरिक तसेच व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी आराखडा तयार केला आहे. यासाठी पाेलिस व महसूल प्रशासन तसेच मनपाचे पथक संयुक्तरीत्या कारवाई करणार आहेत. बुधवारपासून शहरात कारवाइला प्रारंभ केला जाणार आहे.
प्रतिष्ठाने, वाणिज्य संकुलांची हाेणार तपासणी
काेराेनाला आळा घालण्याच्या अनुषंगाने शहरातील मुख्य बाजारपेठ असाे वा कानाकाेपऱ्यातील लहानमाेठी सर्व प्रकारची प्रतिष्ठाने, दुकाने व वाणिज्य संकुलांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी व्यावसायिकांनी काेणत्या उपाययाेजना केल्या, याबद्दल माहिती घेतली जाईल. त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यास किंवा नियमांचे पालन न करणारे ग्राहक आढळून आल्यास दाेघांकडूनही सक्तीने दंड वसूल करण्याचे मनपा आयुक्त निमा अराेरा यांचे निर्देश आहेत.
काेराेनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेतल्यास कारवाईची गरज भासणार नाही. तसे हाेत नसल्यामुळेच विना मास्क दुचाकी, चारचाकी वाहन चालविणारे, ऑटाेचालकांसह बाजारपेठेत बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाईल. कारवाईला आडकाठी घातल्यास फाैजदारीचा पर्याय खुला आहे.
- निमा अराेरा, आयुक्त, मनपा