अकोला: मुलीचे अपहरण करून तिला धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणात प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपी गोपाल अरूण बोदळे(२३) रा. हिरपूर ता. मूर्तिजापूर याला शनिवारी १० वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
मुलीच्या आईने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०१७ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गोपाल बोदळे(२३) याने तिच्या पाच वर्षीय मुलीस हिला सायकलवर बसवून हरभरा देण्याचे सांगून शेतात नेले आणि तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी सुध्दा दिली.
त्यानुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुध्द विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तत्कालिन तपास अधिकारी, पीएसआय पी.जी. सोळंके यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी बाजु मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय फजलु रहेमान काझी, एनपीसी नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.न्यायालयाने अशी ठोठावली शिक्षा आरोपी गोपाल अरूण बोदळे(२३) याला भादंवि कलम ३७६ (२) सह कलम ३. ४ पोक्सो ॲक्ट अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास १ महिना साधी कैद तसेच ३६३ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास १ महिना साधी कैद, कलम ५०६ अंतर्गत दोषी ठरवून आरोपीस २ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
सर्व शिक्षा आरोपीला एकसोबत भोगावयाच्या आहेत. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला त्यांनी फौ.प्र.सं. कलम ३५७-अ (३) अन्वये पिडीतेचे पुर्नवसन करण्याकरिता योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.