अकोला: मिळालेल्या गोपनीय माहितीची दखल घेत चाईल्ड लाईनने अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावात ९ जून रोजी नियोजीत असलेला बालविवाह थांबविण्यात यश मिळविले. एका जागृत नागरीकाने बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनला दिली. यावर कार्यवाही करीत चाईल्ड लाईन ने जिल्ह्यातील दुसरा बालविवाह थांबविला. या आधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील बालविवाह थांबविण्यात चाईल्ड लाइनला यश आले होते.मा. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी बालविवाह प्रतिबंधक समिती गठीत झाली. जिल्हाधिकारी यांनी बालविवाहाची माहिती मिळताच चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आव्हान नागरीकांना केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत एका नागरीकाने ९ जून रोजी नियोजीत असलेल्या बालविवाहाची माहिती १०९८ ला दिली. चाईल्ड लाईनने बाल कल्याण समितीला ही माहिती दिली. बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईनने बोरगांव मंजू पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. चाईल्ड लाईनचे सदस्य पद्माकर सदांशिव व हषार्ली गजभिये यांनी मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून त्यांना बालविवाहापासून परावृत केले. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होई पर्यंत आम्ही तिचा विवाह करणार नाही, असे लेखी स्वरूपात पोलिस स्टेशनला मुलीच्या पालकांनी नमुद केले आहे.हा बालविवाह थांबविण्यासाठी बाल कल्याण समिती अकोला,पोलिस स्टेशन बोरगांव मंजू व चाईल्ड लाईन अकोला यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.पालकांनी कायद्यानुसार आपल्या मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होई पर्यत विवाह करू नये. मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ वर्षा पेक्षा कमी असल्यास तो बालविवाह आहे.असे बालविवाह माहिती झाल्यास चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री मदत क्रमांकावर माहिती देवुन सहकार्य करावे असे आवाहन चाईल्ड लाईन चमूने केले आहे.