अकोला: बाळापूर तालुक्यात १६ मे रोजी नियोजित बालविवाह थांबविण्यात चाइल्ड लाइन १०९८ ला यश मिळाले आहे. एका जागृत नागरिकाने बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाइनला दिली. यावर कारवाई करीत चाइल्ड लाइन १०९८ ने बालविवाह थांबविला.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी बालविवाह प्रतिबंधक समिती गठित झाली. जिल्हाधिकारी यांनी बालविवाहाची माहिती मिळताच चाइल्ड लाइन, अकोला १०९८ या नंबरला संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत एका नागरिकाने १६ मे रोजी एका १९ वर्षीय मुलाचे लग्न होणार असल्याची माहिती १०९८ ला दिली.बाळापूर तालुक्यातील एका गावात १६ मे रोजी होणाऱ्या बालविवाहाची माहिती मिळताच अकोला बालकल्याण समिती सक्रिय झाली. समितीने बाळापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. चाइल्ड लाइनचे सदस्य विद्या उंबरकर व समुपदेशक राहुल शिरसाठ हे त्या मुलाच्या घरी गेले. मुलाचे व त्याच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून बालविवाहापासून त्यांना परावृत्त केले. हे गाव बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे बाळापूर पोलीस स्टेशनला मुलगा आणि त्यांचे आई-वडील गेले. मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्या शिवाय मुलाचे लग्न करणार नाही, असे बयान नमूद करून दिले.अकोल्यातील नियोजित पहिलाच बालविवाह थांबविण्यात अकोला बालकल्याण समितीला यश आले. बालविवाहाला थांबविण्यासाठी बालकल्याण समिती, पातूर पोलीस स्टेशन, बाळापूर पोलीस स्टेशन आणि चाइल्ड लाइन अकोला यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.