अकोला: कोवळ्या वयाच्या मुलींचाही पालक जराही विचार करीत नाही. शिक्षण घेण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातच मुलींना संसारात ढकलण्याचे महापाप काही पालक करीत आहेत. शिवसेना वसाहतीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह बाल संरक्षण कक्षाने गुरुवारी हाणून पाडला. या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी मुलीच्या पालकांसह नातेवाइकांना पोलीस ठाण्यात आले. पालकांनी मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतरच लग्न करण्याचे हमीपत्र पोलिसांना लिहून दिले.काळ बदलला. मुली शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करीत आहेत. पालकही जागरूक झाले आहेत; परंतु अद्यापही काही भागात मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तिचे लग्न लावून देणारे अनेक पालक आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जुने शहरातील शिवसेना वसाहत, दुर्गा चौक येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांच्या मार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी करुणा मंहतारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे, (संरक्षण अधिकारी, बिगर संस्थात्मक काळजी), योगेंद्र खंडारे (माहिती विश्लेषक) व सचिन घाटे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी शिवसेना वसाहतीमध्ये जाऊन अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविला आणि मुलगी अल्पवयीन असल्याबाबतचा पुरावा पालकांना सादर करण्यास बजावले. पालकांनी पुरावा सादर केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यावर, बाल संरक्षण कक्षाने डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना बालविवाह होत असल्याची दिली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत, मुलीच्या व मुलाच्या पालकांसह नातेवाइकांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. १८ वर्षाखालील मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितल्यावर, पालकांनी मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतरच आम्ही तिचे लग्न करू, असे हमीपत्र पोलिसांना लिहून दिले. त्यानंतर पोलिसांनी पालक व नातेवाइकांना सोडून दिले. (प्रतिनिधी)