अकोला : लग्नाला पाच वर्ष झाली तरी, मूलबाळ होत नाही. यावरून पतीसह सासरचे लोक टोमणे मारायचे. तसेच दवाखाना करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून छळ करायचे. या प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पातुरातील एका २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार मेहकर तालुक्यातील पार्डी येथील नितेश महादेव राठोड याच्यासोबत २०१८ मध्ये विवाह झाला. लग्नामध्ये वडिलांनी अडीच लाख रूपये खर्च केला. सहा महिने सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली.
त्यानंतर क्षुल्लक कारणावरून सासरकडील लोक त्रास देऊ लागले. घराचे बांधकाम करण्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होते. त्यानंतरही कसेबसे दिवस काढले. लग्नाला पाच वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने, सासरकडील लोक टोमणे मारून पतीला भडकवून देत होते. त्यामुळे पती मारहाण करायचे. तसेच दवाखाना करण्यासाठी व बांधकामासाठी माहेराहून १ लाख रूपये आणण्याचा तगादा लावून मानसिक छळ करायचे.
पती नितेश महादेव राठोड, सासरे महादेव केशव राठोड, सासू देवका राठोड, जेठ मनोज राठोड, जेठानी अर्चना राठोड, नणंद सोनू तुफान आडे, नणंद कालदा आडे, नंदोई तुफान संग्राम आडे हे क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करायचे. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचे, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.