अकोला: वर्षभरापासून घरात बसून असलेली मुले मोबाइल गेममध्ये अडकली आहेत. अलीकडे लहान मुले मैदानी खेळांपासून दूर जाताना दिसत आहेत. आता कोरोनामुळे हा प्रकार आणखी वाढला आहे. मुलांचा निम्मा वेळ मोबाइलवरच जात असल्याने त्याचे परिणाम समोर येत आहेत. मोबाइलने बालकांचे आरोग्य बिघडविल्याचे दिसून येत आहे. मुलांच्या आरोग्याविषयी सगळे पालक अत्यंत सजग असतात. परंतु तासन्तास मोबाइल पाहणाऱ्या मुलांना पालक काहीच बोलत नाहीत. मोबाइलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडेही पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. गेल्या वर्षभरापासून मुले घरी बसून आहेत. अभ्यासापासून इतर खेळही मोबाइलवरच सुरू आहेत. मैदानी खेळांपासून मुले दूर गेली आहेत. निम्मा वेळ मुलांचा मोबाइलवरच जात आहे. मुलांना डोळ्यांचा त्रास होणे, डोके दुखणे, चिडचिड होणे आदी समस्या उद्भवत आहेत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर पुन्हा वाढत आहे.
मुले कायम मोबाइलवर
लहान मुलांनी जास्त वेळ फोन वापरणे घातक असल्याचे मत नेत्र तज्ज्ञ डॉ. जुगल चिराणिया यांनी व्यक्त केले आहे. मुले कायम मोबाइलवर राहत असल्याने त्यांना डोळ्यांच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण होत आहेत. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांत जळजळ होणे, पुरेशी झोप न होणे, डोके दुखणे यांसारखे त्रास मुलांना होत आहेत. शिवाय चष्मा असेल तर त्याचा नंबरही वाढतो, अशी माहिती डॉ. चिराणिया यांनी दिली.
विटी-दांडू गायब
विटी-दांडू हा खेळ तर अनेक मुलांना आता माहीतही नाही. शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही काही मैदानी खेळांची माहितीच मुलांना नाही. विटी-दांडू, हुतूतू, मामाचं पत्र हरवलं यांसारख्या मैदानावरून गायब होत चाललेल्या खेळांना ऑनलाइनचे नवे मैदान मिळाले आहे.
काेराेनामुळे माेबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाइल आला. त्यामुळे मुलांमध्ये मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढले. मोबाइलमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.