आकोट (जि. अकोला): आकोट शहरातील एका दहा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ३0 जूनच्या रात्री ९ वाजता घडली. या घटनेतील मुलाने नया प्रेस भागात अपहरण करणार्या महिलांच्या हाताला झटका देऊन त्याने सुटका करवून घेतली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून, पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. स्थानिक फरकाडेनगरातील एका दहा वर्ष वयाच्या मुलाला काही महिला हाताला धरून ओढत नयाप्रेस भागातून जात होत्या. सदर महिलेचा हात सैल होताच मुलाने हाताला झटका देऊन सुटका करून घेतली. अपहरण करणार्या महिलांची संख्या तीन असून त्यातील दोघी लुगडे नेसलेल्या व एक महिला साडी नेसलेली असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासोबत एक पुरुषही असल्याचे समजते. येथे काही दिवसांपूर्वीच मनश्री नावाच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. तिचा शोध अद्यापही लागला नसताना पुन्हा मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलीस अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्या टोळीचा शोध घेत असून,त्यांनी गस्त वाढविली आहे.
आकोटात मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न?
By admin | Published: July 01, 2016 2:08 AM