५० एकरातील विविध जातीचे वृक्ष खाक
सायखेड : चिंचोली-रुद्रायणी परिसरातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील जंगलात १३ एप्रिलच्या दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या वणव्यात ५० एकर क्षेत्रात लागवड केलेले विविध जातीचे वृक्ष जळून खाक झाले. या वणव्यात वृक्षांसह चारा खाक झाला असून, रात्रीच्या वेळी संचार करणारे पक्षीसुद्धा मृत झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही आग विझविण्यात ग्रामस्थ व वन विभागाला तब्बल सहा तासानंतर यश मिळाले. या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळीचे वन परिक्षेत्राधिकारी विवेक लाड हे अधिनस्थ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासाठी वनरक्षकांनी अग्निशमन यंत्रांचा वापर केल्याने आग लवकर आटोक्यात आली. ही आग विझविण्यासाठी चिंचोलीचे उपसरपंच शिवाजी राठोड, मनोहर जाधव, दत्ता दांदळे, उमेश पाटील, काशिनाथ वर्गे, बाळकृष्ण राठोड, रघुनाथ वर्गे, सोळंके आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेंद्र जाधव, तलाठी बावस्कर यांनीही चिंचोली येथे जाऊन आढावा घेतला.