- लाेकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाने चायना मांजावर बंदी घातलेली असताना, सर्रास बाजारात चायना मांजाची विक्री होत आहे. या चायना मांजामुळे स्वत:च्या आणि इतरांच्या जिवावर संक्रांत येऊ शकते. त्यामुळे पतंग उडवताना खबरदारी घ्या आणि दोऱ्याचा वापर करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरीत्या उपलब्ध होत आहे. या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापल्या जाऊ शकतो. मांजामुळे चेहऱ्यालासुद्धा इजा होऊन, त्वचा कापली जाते. अलीकडेच मांजाने गळा कापल्यामुळे एका लहान मुलाचा तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नॉयलॉन मांजामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केला जात असल्याने, मांजाचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यास त्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो. उत्सव साजरा जरूर करावा; परंतु उत्सवाला अनुचित घटनेचे गालबोट लागता कामा नये. याबाबत पालक व मुलांनीसुद्धा खबदारी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना चायना मांजासह इतर कोणताही घातक मांजा घेऊन देऊन नये. बऱ्याचदा इमारतीच्या छतावर पतंग उडवताना तोल जाऊन अनेक मुले जखमी, मृत्युमुखीसुद्धा पडली आहेत. त्यामुळे पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि आपल्या मुलांचा आणि इतरांचाही जीव वाचवावा.
मांजामुळे पक्षी व युवक जखमी
सिंधी कॅम्पमधील रहिवासी विकास नारायणदास टहलाणी हा युवक दुचाकीने एलआरटी कॉलेजसमोरून जात असताना त्याच्या गळ्याभोवती चायनीज मांजा अडकला. विकास याच्या डोळ्याजवळ या मांजाने गंभीर दुखापत झाली हाेती. रणपीसेनगरमध्ये एक कबुतर जखमी झाले हाेते. त्याला पक्षिप्रेमींनी जीवदान दिले.
चायनीज मांजा विकणाऱ्यांवर हवी दंडात्मक कडक कारवाई
मकरसंक्रांत आणि पतंग, मांजा हे एक समीकरणच बनले आहे; परंतु पतंगबाजीचा उत्सव निष्पाप जिवांवर बेतत आहे त्यामुळे चायनीज मांजा विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे; मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे हाेताना दिसत नाही त्यामुळे काही विक्रेते खुलेआम चायनीज मांजा विकताना दिसतात. पाेलिसांनी या प्रकरणात दक्ष राहून पतंग विक्रेत्यांची झाडाझडती घेण्याची गरज आहे.
संक्रांतीनिमित्त संपूर्ण आकाश पतंगमय होते; पण याचा खरा त्रास होतो मुक्तसंचार करणाऱ्या पक्ष्यांना. गेल्या काही वर्षांमध्ये घातक मांजामुळे शेकडो पक्ष्यांचे जीव गेले आहेत. आकाशात होणाऱ्या पतंगाच्या गर्दीमुळे पक्ष्यांना मोठी दुखापत होते.
- अमाेल सावंत, पक्षिमित्र