अकोला: सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत चालू वर्षासाठी पातूर तालुक्यातील माळराजुरा या गावाची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संमतीने ही निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केले आहे.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने १७ व्या लोकसभेत निवडून आलेल्या संसद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील गावांची निवड करण्याचे बजावले. त्यानुसार २०२४ पर्यंतच्या पाच वर्षांत पाच गावांची निवड करून ती गावे आदर्श करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ८ आॅगस्ट रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये देण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील संबंधित खासदारांनी १५ आॅगस्टपर्यंत गावांची निवड करावी, त्या गावाची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामसभेचा ठराव घेऊन गावाचे जाहीर करण्याचे म्हटले होते. त्याचवेळी निवड केलेल्या गावांची माहिती तत्काळ केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडून मागविण्यात आली. २०२४ पर्यंत पाच गावांची निवड करून ती गावे आदर्श करण्याची जबाबदारी संबंधित संसद सदस्य (खासदार) यांच्यावर सोपवलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माळराजुरा गावाची निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात आणखी चार गावांची निवड होणार आहे.