अकोला-मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचार घेत असताना त्याला कॉलरा झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्यामुळे दहातोंडा येथे आरोग्य विभागातर्फे कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असून, आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यात महिनाभरात काॅलराचा उद्रेक होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे काॅलराचे रुग्ण आढळले होते. येथील साथ नियंत्रणात येत नाही तोच मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथे काॅलरा बाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हा व तालुका स्तरीय पथकाकडून उपाययोनजा सुुरू करण्यात आल्या आहेत. बुधवारी गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
उपाययोजनांसाठी पाच पथके तैनात
दहातोंडा येथे कॉलराचा रुग्ण आढळून आल्याने गावात साथ रोग पसरू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत. एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह आवश्यक मनुष्यबळ येथे कार्यरत आहे. गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
२६० घरात अकराशेवर नागरिकांची तपासणीदहातोंडा येथे बुधवारी पाच पथकांद्वारे एकूण २६० घरांमधील ११६० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या येथील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
दहातोंडा येथे कॉलराचा रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी यांनी उद्रेकाची माहिती घेवून परिस्थिती नियंत्रणाकरिता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय बुधावारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका अधिकारी यांच्या पथकाने दहातोंडा येथे भेट देवून साथ नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.