अकोला, दि. ८- व्यवसाय वृद्धीच्या नावाखाली कौटुंबिक मित्राच्या माध्यमातून पैसे व्याजाने घेऊन परत करण्यासाठी नकार देणार्या चंगोईवाल इंडस्ट्रिजचा संचालक श्यामलाल चंगोईवाल याला तीन महिन्यांचा कारावास, धनादेशाची मूळ रक्कम व नुकसान भरपाई म्हणून ४ लाख ५ हजार रुपये तक्रारदारास देण्याचा आदेश चवथे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश यशोदीप मेश्राम यांनी दिला.जुने शहरातील रेणुका मुकुंद भुसारी यांनी चंगोईवाल इंडस्ट्रिजला २ लाख ५0 हजार रुपये ठेव म्हणून दिले होते. चंगोईवाल इंडस्ट्रिजचा संचालक श्यामलाल चंगोईवाल याने या रकमेच्या कायदेशीर परतफेडीपोटी भुसारी यांना धनादेश दिला होता; परंतु हा धनादेश बँकेत न वटल्यामुळे भुसारी यांनी चंगोईवाल यांच्याकडे विचारणा केली. चंगोईवाल याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केल्यानंतर भुसारी यांनी चंगोईवालविरुद्ध खटला दाखल केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश यशोदीप मेश्राम यांनी चंगोईवाल यास तीन महिन्यांचा कारावास ठोठावला, तसेच ठेव म्हणून दिलेले २ लाख ५0 हजार रुपये, तसेच नुकसान भरपाई म्हणून ४ लाख ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईची रक्कम अदा न केल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार, असे आदेशात नमूद केले आहे. रेणुका भुसारी यांच्याकडून अँड. डी. आर. गोयनका, अँड. पुनित गोयनका यांनी काम पाहिले.
चंगोईवाल कंपनीच्या संचालकास तीन महिन्यांचा कारावास!
By admin | Published: March 09, 2017 3:29 AM