शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पारंपरिक शेतीपद्धतीतून उत्पादन तसेच बाजारभावातील घसरणीमुळे उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत पश्चिम वऱ्हाडात अनेक शेतकऱ्यांचा कल शेतीपूरक आणि महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे वाढला आहे, त्यामुळे रेशीम शेतीचा विस्तार होऊ लागला आहे. उत्पादित मालाला चांगले दरही मिळत आहे.
रेशीम उत्पादकांना कोषनिर्मितीसाठी अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो. २८ दिवस त्याचे संगोपन करावे लागते. यातील पहिले दहा दिवस खूप काळजी घ्यावी लागते. दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर मात्र पुढील १८ दिवसांतच अळी कोष अवस्थेत पोहोचते. १०० अंडीपुंजांपासून ५५ हजार अळ्या मिळतात. सरासरी ५० हजार तरी मिळाव्या असे अपेक्षित राहते किंवा तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो; परंतु पहिल्या टप्प्यात संगोपनात काही उणिवा राहिल्यास १०० अंडीपुंजांपासून अळ्यांची उपलब्धता कमी मिळते. रेशीम व्यवसायातील ही अडचण लक्षात घेता दहा दिवस संगोपन केलेल्या अळ्यांचा पुरवठा करणारे चॉकी सेंटर पश्चिम वऱ्हाडात पाय रोवू लागले आहेत. पश्चिम वऱ्हाडात चार ठिकाणी चॉकी सेंटर कार्यान्वित झाले आहे. या सेंटरच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न होत असल्याने सेंटरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
--बॉक्स--
या शेतकऱ्यांनी उभारले सेंटर
अकोला जिल्ह्यात शंकर जाधव व मंगेश डाखोरे या शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक, बुलडाणा जिल्ह्यात गुळवे यांचे एक, वाशीम जिल्ह्यात महादेव बोरकर यांचे एक याप्रमाणे चार चॉकी सेंटर उभे झाले आहेत.
--कोट--
मागील चार-पाच वर्षांपासून चॉकी सेंटर सुरू आहे. यावर्षी या सेंटरला शासन मान्यता मिळाली. दर महिन्याला दोन-तीन हजार चाॅकीचा शेतकऱ्यांना पुरवठा केला जातो. अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मागणी राहते. याकरिता तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
- मंगश डोखोर, चॉकी सेंटर, पाथरन, ता.पातूर