लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहराचे तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक तथा मुंबई येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण (आयपीएस) यांच्यावर १९९३ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच त्याचा साथीदार बजरंगसिंह सरदारसिंह राजपूत यास सहा महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली.रमजान महिन्यातील ईदनिमित्त तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक तथा मुंबई येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे ताजनापेठ पोलीस स्टेशन चौकीमधील शांतता समितीची बैठक आटोपल्यानंतर पथकासोबत २९ आॅगस्ट १९९३ रोजी रात्री दुकाने बंद करीत निघाले होते. टॉवर चौकातील आशिष बार रात्री उशिरा उघडा दिसल्याने त्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना बार बंद करण्याचे सांगितले. तेव्हा पोलीस कर्मचारी बारमध्ये गेले आणि त्यांनी ग्राहकांना बाहेर काढले; मात्र बारमध्ये एका टेबलवर रणजितसिंग गुलाबसिंग चुंगडे व त्याचा साथीदार बजरंगसिंग सरदारसिंग राजपूत हे बसलेलेच होते. पोलिसांनी त्यांना जाण्याचे सांगितले; मात्र त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या दिशेने ग्लासही फेकला. हा प्रकार व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना कळताच त्यांनी चुंगडे व राजपूत या दोघांना वाहनात बसविले. पोलिसांचे वाहन रामदासपेठ पोलीस स्टेशनकडे जात असतानाच पेट्रोल पंपनजीक रणजितसिंह चुंगडे याने लक्ष्मीनारायण यांच्यावर बंदुकीने गोळी झाडली; मात्र सुदैवाने ही गोळी लक्ष्मीनारायण यांच्या कानाजवळून निघून गेली. हा प्रकार झाल्यानंतर दुसरी गोळी झाडण्याचा बेत असतानाच पोलीस कर्मचारी रमेश जंजाळ जोरात ओरडल्याने वाहन चालकाने वाहन बाजूला उभे केले. लगेच चुंगडेजवळील बंदूक व जिवंत काडतूस जप्त केली. राजपूतकडील चाकूही पोलिसांनी जप्त केला. दोन्ही आरोपींना रामदासपेठ ठाण्यात आणून त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३५३, २९४, ५०६, आणि ३/२५ आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास डी. डी. गावंडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १२ साक्षीदार तपासल्यानंतर रणजित चुंगडे यास आठ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तर राजपूत यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली; मात्र त्याने ही शिक्षा यापूर्वीच भोगली आहे. राजपूतला सहा महिन्यांचा कारावासबजरंगसिंग राजपूत यास शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची शिक्षा न्यायालयाने सुनावली, तर अश्लील शिवीगाळप्रकरणी तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांची सक्त मजुरीचे आदेश दिले आहेत; मात्र सदर आरोपीने शिक्षा भोगल्याने त्याला केवळ दंड भरावा लागणार आहे.१९९३ मध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली. यामुळे गुंडावर वचक निर्माण होणार असून, शासकीय कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न होणार नाही. न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेमुळे न्याय मिळाला.- व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण,अतिरिक्त पोलीस महासंचालकपोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई.
चुंगडेस आठ वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Published: July 01, 2017 12:47 AM